बीड : काश्मीरच्या श्रीनगरमधून सुरू झालेली सायकल रेस कन्याकुमारीत शनिवारी रात्री ९ वाजता संपली. दोन अंध मित्रांनी चार पायलट आणि नऊ सहकाऱ्यांच्या पाठबळावर २२८ तासांत ३ हजार ७५८ किमीचा प्रवास सायकलवरून (टॅन्डम) पूर्ण केला. दिव्यांग असतानाही अशा प्रकारची कामगिरी करून या अंधांनी नवा विक्रम तयार केला आहे.
सागर बोडखे (नाशिक) आणि अजय ललवाणी (मुंबई) यांनी दोघांनी रोज १०० ते २०० किमी सायकल चालवून सराव केला. त्यानंतर रेस ॲक्रॉस इंडिया यांच्यावतीने आयोजित केलेल्या मानाच्या सायकल शर्यतीत त्यांनी सहभाग घेतला. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रेसला सुरुवात झाली. वेगवेगळ्या १४ राज्यातून प्रवास करत २२८ तासांत कन्याकुमारी गाठले. यामध्ये बोडखे यांनी १६२० तर ललवाणी यांनी २१३८ किमी सायकल चालवली. तेथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आता ते रेस ॲक्रॉस अमेरिकासाठी पात्र ठरले असून, ही रेस ५ हजार ५०० किमीची असणार आहे.
टीममध्ये यांचा समावेशबोडखे व ललवाणी यांचे पायलट उल्हास कुलकर्णी, शिवम खरात, सुशील सारंगधर, अमरीश हे होते. तर, देखभाल व काळजीसाठी बीडचे डॉ. अनिल बारकूल, रामेश्वर चव्हाण, लखन ललवाणी, संकेत भानोसे, संतोष संसासरे, महेश दाभोळकर, सतीश जाधव, गिरीश बंभोले, अमित कुमार यांनी काम पाहिले.
२७ तास चालवली सायकलरेसच्या आठव्या दिवशी ललवाणी यांनी सलग २७ तास सायकल चालवली. हे दोन्ही सायकलपट्टू दररोज सरासरी ४०० किमीचा टप्पा पूर्ण करत होते.
पायलट थकले, पण...या रेसमधून शारीरिक क्षमता दिसते. परंतु यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणेही आवश्यक असते. रेस चालू असताना मध्येच एक पायलट थकला. त्यामुळे सर्वच घाबरले. परंतु, त्याला प्रोत्साहन दिले. मानसिक आधार दिला. पायलटला बळ आले आणि तो पुढे निघाला. कन्याकुमारीत पोहोचल्यावर सर्वांनीच आनंद व्यक्त केला. यावेळी अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले होते, असा अनुभव बीडच्या डॉ. अनिल बारकूल यांनी सांगितला.
मानसिक आधारावर यशोशिखरनाशिक, मुंबईचे दोन अंध सायकलपटूंना सोबत घेऊन आम्ही सायकल रेसमध्ये सहभाग घेतला. पोलंड, केनियासारख्या देशांसह आपल्या देशातील अनेक टीम सहभागी होत्या. परंतु, आमच्या टीमने दिव्यांग असतानाही अवघ्या २२८ तासांत ३७५८ किमीचा प्रवास पूर्ण केला. आम्हाला या विक्रमाचे साक्षीदार होता आले, याचे भाग्य समजतो. रेसदरम्यान अनेक अडचणी आल्या, परंतु प्रोत्साहन आणि मानसिक आधार दिल्याने यशोशिखर गाठले.- डॉ. अनिल बारकूल, क्रू मेंबर, बीड