बीड : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक मनोज जागडे याने २६ जानेवारी रोजी दिल्ली येथील राजपथ येथे झालेल्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघासमवेत यशस्वी संचलन केले.
देशातील विविध विद्यापीठांतून निवड चाचणीद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेचे २०० स्वयंसेवक या संचलनात सहभागी होतात. यावर्षी महाराष्ट्रातून १४ विद्यार्थी पात्र ठरले होते. यात मराठवाड्यातून दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यात मनोज जागडेचा समावेश होता. कोरोनाच्या परिस्थितीमुळे यावेळी फक्त १०० स्वयंसेवकांनाच संचलनासाठी निवडले होते. यातही मनोज जागडेने यशस्वी संचलन केले.
तसेच १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही जागडे याने सक्रिय सहभाग नोंदवला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी मनोज जागडे याचा सत्कार केला. याप्रसंगी उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते, प्रा. सुधाकर ढवळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. महारूद्र जगताप, डाॅ. भारत दहे, डाॅ. सुचिता खामकर, प्रा. महादेव शिंदे, डाॅ. शैलेश आकुलवार, डाॅ. बापू जाधवर, डाॅ. मनोहर सिरसाट, डाॅ. ईश्वर छानवाल, प्रा. संदीप परदेशी, डाॅ. रवींद्र काळे, प्रा. एम.एन. चौरे, प्रबंधक भास्कर सुरवसे, एल.बी. शिंदे, महारूद्र शेळके यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनोजचे कौतुक केले आहे.