लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दुर्बिनद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडली. आतापर्यंत मराठवाड्यात एकाही उपजिल्हा रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. केजच्या उपजिल्हा रुग्णालयाने एक पाऊल पुढे टाकत पहिल्यांदा अशी शस्त्रक्रिया करुन विक्रम आपल्या नावी केला आहे.राधिका (वय ३७ रा.केज, नाव बदलले) असे शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव आहे. राधिका यांच्या गर्भाशयातील आतील बाजू चिकटलेली (अॅशेरमन्स सिंन्ड्रोम) होती. त्यांना यामुळे मोठा त्रास होत होता. शस्त्रक्रियेशिवाय त्यांना पर्याय नव्हता. केज रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून त्यांची शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी परवानगी देण्यासह स्वता: ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना मदत केली.विशेष म्हणजे कमी जखम आणि कमी त्रास व्हावा, यासाठी दुर्बिनीतून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. यासाठी नेहमीपेक्षा केवळ २५ टक्केच रक्तस्त्राव होतो. तसेच आठवडाभर रुग्णालयात राहण्याची गरज नाही. तिसऱ्या दिवशी रूग्णाला घरी पाठविले जात असल्याचे डॉ.थोरात यांनी सांगितले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह डॉ. स्वप्नील ढाकणे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांना डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. बालासाहेब सोळंके, डॉ.दिगांबर मुंडे, परिचारीका ज्योती अरकडे, अंबाड, सेवक नासेर, राऊत यांनी सहाय्य केले.खाजगी रुग्णालयामध्ये ५० हजार रुपये खर्चबीड जिल्ह्यात यापूर्वी जिल्हा रुग्णालयात दुर्बिनद्वारे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मात्र, उपजिल्हा रुग्णालय स्तरावर पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया झाली आहे. यासाठी खाजगी रुग्णालयात ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयातच सर्व तंत्र, यंत्र उपलब्ध करुन या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने सामान्यांना मोठा आधार मिळाला आहे.
केजमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:25 AM