बीड : गर्भपात करताना एका ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी सुदाम मुंडे, त्याची पत्नी सरस्वती आणि मृत महिलेच्या पतीला गेल्यावर्षी जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जामिनावर बाहेर येताच सुदाम मुंडे याने पुन्हा मुलीच्या रुग्णालयात आपले दुकान सुरू केले आणि तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
२०१० ते २०१२ या कालावधीत त्याच्या रुग्णालयात तब्बल तीन हजार ९४० गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या विक्रीडिल या औषधींचा वापर झाला होता. आरोग्य विभागाने केवळ १० खाटांची परवानगी दिली असताना ६४ खोल्यांत तब्बल ११७ खाटा होत्या. परळीतील उच्चशिक्षित असलेला सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुदाम स्त्रीरोग आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक असा दुहेरी पदविधारक होता. या दाम्पत्याचा वैद्यकीय व्यवसायही जोरात होता. मात्र मिळणाऱ्या पैशांवर समाधानी नसलेल्या या दाम्पत्याने आरोग्य पेशाला काळीमा फासायला सुरवात केली आणि बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात सुरू केले. परळीतील मोजक्या आर्थिक सक्षम व्यक्तींपैकी एक असल्याने त्याची राजकीय उठबसही होतीच. याचाच गैरफायदा घेत त्याने महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा आपल्या खिशात असल्याचा आविर्भाव आणला. डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करीत असे. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते.
महिलेचा गर्भपात करताना मृत्यू सुदाम मुंडेने १८ मे २०१२ रोजी विजयमाला महादेव पटेकर (रा. भोपा, ता. धारूर) या ऊसतोड मजूर महिलेचा बेकायदा गर्भपात केला. यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५ आणि ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार, सेक्शन ३अ, सेक्शन ९, सेक्शन १७, सेक्शन २९ नुसार गुन्ह्याची नोंद झाली होती. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन ४ आणि ६ चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला होता.
१७ आरोपी या प्रकरणामध्ये होते१७ आरोपींमधील जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते. इतर दोघांचाही दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. याप्रकरणी उर्वरित ११ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. २०१९ साली याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह डॉक्टर दाम्पत्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. सहा महिन्यांपूर्वी या तिघांनाही सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.