बीड : परळी गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने बेकायदेशीररीत्या सुरू केलेल्या दवाखान्यात उपकरणे व औषधी पुरविणारे पोलिसांच्या हाती लागले आहेत. औषधांवरील कारवाईसंदर्भात परळी पोलिसांनी औषध प्रशासनाकडे अभिप्राय मागितला आहे. उपकरणे पुरविणारा सध्या क्वारंटाईन असल्यामुळे त्याला अद्याप चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही; परंतु या दोघांवरही सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान, मंगळवारी सुदाम मुंडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर येताच पुन्हा बेकायदेशीररीत्या दवाखाना सुरू केला होता. ५ सप्टेंबर रोजी आरोग्य, महसूल व पोलिस प्रशासनाने त्याच्या दवाखान्यावर छापा टाकून त्याचा पर्दाफाश केला होता. त्याच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, सुदामच्या दवाखान्यात एक्स-रे मशीनसह इतर उपकरणे आणि औषधांचा मोठा साठा सापडला होता. हे सर्व त्याला परळीतीलच दोन व्यक्तींनी पुरविले होते. त्यांची चौकशी पोलीसांकडून केली जात आहे.
उपकरणे पुरविणाऱ्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. तो कोरोनामुक्त झाला असला तरी त्याला क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. दोन दिवसानंतर तो क्वारंटाईनमधून मुक्त होणार असून नंतर त्याला चौकशीला बोलावले जाणार आहे. औषधी पुरविणाऱ्या व्यक्तीवर कारवाई संदर्भात पोलिसांनी औषध प्रशासनाला माहिती दिली आहे. त्याच्यावर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई करावी, यासंदर्भात मार्गदर्शन मागविले आहे.
न्यायालयीन कोठडीत रवानगीसुदाम मुंडेला सुरुवातीला पाच दिवसांची व नंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती. मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.