परळी:पोलिसांनी चौकशीसाठी बोलविलेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. झरीन खान ( 48, रा मलीकपुरा, परळी) असे मृताचे नाव आहे. त्यांचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याचे त्यांच्या मुलाने म्हटले आहे. दरम्यान मयत झरीन खान यांच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी (पोस्ट मार्टम )इन कॅमेरा होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक शेख शरीफ यांनी दिली
याबाबत पोलिसांनी सांगितले की, परळीत 6 जून रोजी मुनिमाच्या हातातील 4 लाख 90 हजार रुपय रोकड असलेली बॅग चोरीस गेली होती. याप्रकरणी २ संशयित आरोपींना 13 जून रोजी रात्री परळी शहर पोलिसांच्या एका पथकाने ताब्यात घेतले. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने झरीन खान यांना उपजिल्हा रुग्णालयमध्ये पोलिसांनी दाखल केले होते. तेथे तपासून डॉक्टरांनी खान यांना मृत घोषित केले. तर याच प्रकरणात मलीकपुरा भागातीलच एकजण अटकेत आहे. खान यांचे आझाद चौकात गॅरेज आहे.
दरम्यान, झरीन खान यांच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर पोलीस ठाण्याजवळ गर्दी जमली होती. अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व स्थानिक पोलिसांनी गर्दीला नियंत्रित केले. पोलिसांनी गर्दीला सहकार्याचे आवाहन केले. सध्या शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून शांतता आहे.
शहरात शांतता आहे परळीतील जबरी चोरी प्रकरणात मालिकपुरा भागातील दोघजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी झरीन खान यांना अचानक फिट आल्यानंतर प्रकृती बिघडून मृत्यू झाला आहे. मलीकपुरा भागातीलच दुसरा आरोपी अटकेत आहे. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून शांतता आहे. - चंद्रकांत गोसावी, सपोनि, परळी शहर