यंदाचा गळीत हंगाम चालू असून साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या विशेष भरारी पथकाने १९ जानेवारी रोजी कारखान्यास अचानक भेट देऊन वजन काट्याची तपासणी केली. सध्या शासनाच्या आदेशानुसार सर्वच कारखान्यांची तपासणी केली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ही तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत वैद्यनाथ साखर कारखान्याचे वजन काटे हे अचूक आढळून आले असून, तसा अहवाल पथकाने कारखान्यास दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दीक्षितुलू यांनी दिली आहे.
नायब तहसीलदार बाबूराव रूपनर, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक पी. बी. मेने, लेखा परीक्षक श्रेणी-१ ए. बी. नागरगोजे, शेतकरी प्रतिनिधी लक्ष्मण भरत सोळुंके, माणिक रेऊ पवार, पोलीस प्रतिनिधी रामचंद्र केकान यांच्या विशेष पथकाने कारखान्यास भेट देऊन कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली. काट्यांच्या तपासणी वेळी कारखान्याचे चिफ केमिस्ट रमेश जायभाये, केनयार्ड सुपरवायझर वाल्मीक अघाव, केन अकाउंटंट माणिक कराड यांच्यासह ऊस उत्पादक सभासद शेतकरी, तोडणी मजूर, वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.