लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील जिल्हा परिषद व अनुदानित खाजगी शाळांना सोमवार ते शनिवार या सहा दिवसात शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दाळ खिचडी, मटकी खिचडी, वरण भातासह विविध पदार्थ देणे बंधनकारक असताना देखील शाळेतील मुलांना वाटप होत नव्हते. मात्र दोन दिवसांपासून शालेय पोषण आहार तपासणीसाठी केंद्रीय पथक तालुक्यात आल्याने या धास्तीने मुलांना शाळेत भरपूर व चांगली खिचडी तसेच हॅन्डवॉश, नॅपिकन, पुसायला नॅपिकन मिळू लागले आहे.शालेय मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व विद्यार्थ्यांची गळती थांबावी तसेच शाळेत मुलांना पोषक आहार मिळावा या उद्देशाने शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक अशा एकूण जवळपास ३३० शाळा व अनुदानित खाजगी ५२ च्या जवळपास शाळेतील मुलांना सोमवार ते शनिवार अशा ६ दिवस मुगदाळ, तुरदाळ, मसूरदाळ, मूग, मटकी, वाटाणा खिचडी, उसळभात तसेच दर शनिवारी पूरक आहार यात बिस्किटे, चिक्की, फळ देण्याची योजना आहे.मात्र तालुक्यातील जिल्हा परिषद व काही खाजगी शाळेत खिचडीच शिजत नव्हती तर काही ठिकाणी दररोज नुसती पिवळी खिचडी मिळत होती. मात्र दोन दिवसांपासून शालेय पोषण आहार योजनेतील केंद्रीय पथक जिल्ह्यात आहार योग्य पध्दतीने व चांगला दिला जातो की नाही याची तपासणी करण्यासाठी हे पथक ३ ते १० डिसेंबर रोजी तालुक्यात येत असल्याची माहिती मिळताच सर्वच शाळेत भरपूर प्रमाणात व चांगल्या दर्जाची खिचडी शिजू लागल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. तसेच या आधी व कधी न दिसणारे भांडे घासण्यासाठी साबण, मुलांना हात धुण्यासाठी हॅडवॉश व नॅपकिन सुध्दा सर्वच शाळेत दिसू लागल्याने मुलांमध्ये व पालकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या धास्तीने का होईना मुलांना शालेय पोषण आहार मिळू लागल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे पोषण आहार दिला जावा, यासाठी ग्रामस्थांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे.
पथकाकडून अचानक तपासणी, खिचडी झाली ‘खमंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:44 AM