- नितीन कांबळेकडा: श्वानाच्या पाठीमागे धावताना बिबट्या विहीरीत पडला. वनविभाग, पोलिस प्रशासन, प्राणीमित्र यांचे बचावाचे प्रयत्न सुरू असताना अचानक बिबट्याने विहिरीतून बाहेर झेप घेत शेतात धाव घेतली. यामुळे बचाव कर्मचारी, प्राणीमित्र आणि ग्रामस्थांत गोंधळ उडाला.
आष्टी तालुक्यातील पांगरा येथील रामनाथ माणिक मिसाळ यांच्या शेतातील विहिरीत गुरूवारी रात्री श्वानाच्या मागे धावताना बिबट्या पडला. आज सकाळी शेतात गेल्यावर मिसाळ यांना विहीरीत बिबट्या आढळून आला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक, अंमळनेर ठाण्याचे पोलीस हवालदार पोपट मंजुळे, कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे आणि ग्रामस्थ बचाव कार्यासाठी शेतात दाखल झाले. आत जाळी टाकून बिबट्यास बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मोठी जाळी आणि एक पिंजरा विहिरीवर लावण्यात आला. मात्र, अचानक बिबट्याने आतील खडक आणि पाईपच्या सहाय्याने डरकाळी फोडत विहिरीतून बाहेर झेप घेतली. यामुळे बचाव पथक, प्राणीमित्र आणि ग्रामस्थांमध्ये एकच गोंधळ उडाला. बिबट्याने लागलीच शेतात गायब झाला.
बचावकार्यासाठी घटनास्थळी विभागीय वनअधिकारी कैलास गिते वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, वनपाल बाबासाहेब मोहळकर, वनरक्षक अशोक काळे, बाबासाहेब शिंदे, सारिका पाखरे, पोलिस हवालदार पोपट मंजुळे, प्राणीमित्र नितीन आळकुटे आदी शेतात उपस्थित होते.
गुरूवारी पाडला तीन शेळ्यांचा फडशापांगरा परिसरात बिबट्याने गुरूवारी रात्री तीन शेळ्याचा फडशा पाडला. नंतर श्वानाच्या मागे धावत असताना अचानक विहीरीत पडला. बिबट्या नियमित शिकार करत असल्याने या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.