बीड : झोपेतून अचानक जाग आली की, गोष्टी बदललेल्या दिसतात. कोरोना वाढतोय. परिस्थिती नाजूक आहे. जिथं लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, तिथं कृपया राजकारण करू नका. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असा सल्ला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींना दिला आहे.
राज्य सरकारने केंद्राकडून आलेल्या दोन लाख लसींपैकी बीड जिल्ह्याला २० डोस प्राप्त झाल्यावरून माजी पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांच्या त्या ट्विटवरून पालकमंत्री मुंडे यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. कोव्हॅक्सिन लसीचे जिल्ह्यात १३२९० डोस शिल्लक असून हे डोस व नवीन आलेले डोस केवळ लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वापरावेत, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात शिल्लक लसी व आवश्यक लसीचे प्रमाण लक्षात घेता नवीन दोन लाख लसींचे वितरण करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की, बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्या प्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे त्यांना ज्ञात नसेल, असा खोचक टोला बहिणींना लगावला आहे.
बीड जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे ६८०० व कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडिसिविर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये, यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असेही धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
एक पत्र प्रधानमंत्र्यांना पण पाठवा
मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! अशी विनंतीदेखील मुंडेंनी दोन्ही भगिनींना केली आहे.
बीड जिल्ह्यात जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरिकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे तिथं नको, असे भावनिक आवाहन धनजंय मुंडेंनी केले आहे.
लसींचा स्टॉक संपायच्या आत, पुढचा स्टॉक पाठविण्यात येईल व लसीकरण प्रक्रिया विनाव्यत्यय सुरू राहील, अशी माहिती आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे.