बाजार बंद, ग्राहक नाही :
पुरूषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील शेतकरी रामकिशन महादेव कोरडे यांच्या शेतातील शेवग्याच्या ८०० झाडांना लगडलेल्या शेंगा सलग दुसऱ्या वर्षी ग्राहकी नसल्याने जागेवरच वाळून गेल्या. दोन वर्षांत त्यांना ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
माजलगाव शहरापासून २ कि.मी.अंतरावर राष्ट्रीय महामार्गारील फुलेपिंपळगाव शिवारात रामकिशन महादेव कोरडे यांची साडेतीन एकर जमीन असून त्यापैकी एका एकरात ५ वर्षांपूर्वी शेवग्याची लागवड केली होती. एका एकरात त्यांनी ८०० झाडे लावली होती. वर्षातून या शेवग्याला दोनवेळा बहार येत असल्याने दोन्ही बहारचे मिळून चांगले उत्पादन मिळत असे. दरवर्षी शेवग्याच्या शेंगांना ४० ते १०० रुपये किलोप्रमाणे भाव मिळत असल्याने कोरडे यांना दरवर्षी ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे.
गतवर्षी आणि यावर्षी शेवग्याला बहार येण्याची व कोरोनामुळे लॉकडाऊन होण्याची एकच वेळ झाल्याने शेवगा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. याला ठोक बाजारात केवळ ४ ते ५ रुपये किलो तर किरकाेळमध्ये १० रुपये भाव मिळू लागल्याने झाडाच्या शेंगा काढण्याचा खर्च निघणे मुश्कील झाले. यामुळे यंदा त्यांनी झाडाच्या शेंगाच काढल्या नाहीत. यामुळे शेवग्याच्या झाडालाच शेंगा राहिल्याने त्या निबर झाल्या. या शेंगा झाडालाच निबर झाल्याने त्याचे वजन वाढल्याने झाडाच्या फांद्या अक्षरशः तुटू लागल्याने रामकिशन कोरडे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
गेल्यावर्षी केवळ एक लाख रुपयांपर्यत उत्पन्न झाले असल्याने केलेला खर्चही निघू शकला नाही तर यावर्षी एक रूपयाही मिळाला नसल्याचे रारमकिशन कोरडे यांनी सांगितले. शेतावर त्यांच्यासह त्यांची दोन मुले व त्यांची पत्नी राबतात.त्यांचा रोजगार देखील निघू शकला नाही.
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये
दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचे ग्राहकी व भाव मिळू न शकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी खचून न जाता पहिल्याच जोमाने काम करावे व पुढील बहार लवकरात लवकर कसा येईल यासाठी प्रयत्न करावेत.
-- रामकिशन कोरडे , शेवगा उत्पादक शेतकरी, माजलगाव
===Photopath===
290421\img_20210429_122811_14.jpg