माजलगाव : जय महेश साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर अचानक उलटल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या २५ मेंढ्या उसाखाली दबल्याने ठार झाल्या तर १७ मेंढ्या जखमी झाल्या. गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या मेंढ्या पाथरी व वडवणी तालुक्यातील आहेत.
माजलगाव शहराकडून परभणी रोडवरून जय महेश कारखान्याकडे डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर (क्र. एम.एच.२३ क्यु ३८३४) ऊस घेऊन जात होते. हे ट्रॅक्टर अचानक उलटल्याने माजलगावच्या दिशेने येणाऱ्या २५ मेंढ्या उसाखाली दबून ठार झाल्या तर १७ मेंढ्या जखमी झाल्या. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मेंढ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता जवळपास सर्वच मेंढ्या दगावल्या. या मेंढ्या रघुनाथ बिरू मुसळे (रा. बु. सारोळा, ता.पाथरी), भागवत काशीनाथ मुसळे (रा. बानेगाव, ता. पाथरी) व विश्वनाथ बिरू मुसळे (रा. उपळी, ता. वडवणी) येथील असून दरवर्षीप्रमाणे ते या भागात कोणाच्या तरी शेतात ह्या मेंढ्या लेंडीखतासाठी घेऊन येतात. या घटनेत तिघांचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे तर यात एक मादा होता त्याची किंमत एक लाखापेक्षा जास्त आहे.