केज : लग्नातील हुंड्याचे पैसे घेऊन ये म्हणून सासरचे लोक मारहाण व मानसिक छळ करीत असल्याने त्यांच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार मयत विवाहितेच्या पती, सासू-सासरे यांच्यासह सहा जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तालुक्यातील शिरपुरा येथील कांताबाई व काशीनाथ केदार यांची मुलगी शितल हिचा विवाह २०१५ मध्ये रीतीरिवाजा प्रमाणे काशीनाथ केदार यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा सूरज रामराव भांगेसोबत झाला होता. शीतल हिच्या वडिलांकडे हुंड्यातील ठरावा प्रमाणे कबूल केलेले सोन्याचे एक लाख रुपये देणे होते. म्हणून त्यासाठी शीतल हिचा तिचा नवरा व सासरचे लोक तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. तसेच शीतल हिस सूरज पासून एक दोन वर्षे वयाची मुलगी झालेली आहे. शीतलला दिवाळीच्या सणादरम्यानच्या काळात तिच्या सासरच्या लोकांनी घरातून हाकलून देत घराबाहेर काढले होते त्यामुळे दिवाळी पासून आई-वडिलांकडे शिरपुरा येथे माहेरी रहात होती.१८ जानेवारी रोजी शीतलचा नवरा सूरज व त्याचे आईवडील हे शीतलला सासरी नांदायला घेऊन जाण्यासाठी शिरपुरा येथे आले. त्या नंतर तिच्या आई-वडिलांनी त्यांची समजूत काढून व तिला चांगले सांभाळा म्हणून सायंकाळी त्यांच्या सोबत शीतल व तिची लहान मुलगी ईश्वरी हिस डोका येथे पाठविले. त्याच दिवशी रात्री १० च्या सुमारास डोका येथील सरपंच गोरख भांगे यांनी शितलच्या आई वडिलांना कळविले की, शीतल हिने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. माहिती मिळताच शीतलचे आई-वडील व नातेवाईक डोका येथे गेले. त्यावेळी शीतलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिची दोन वर्षांची मुलगी जवळ होती व घराची खिडकी उघडी असल्याचे दिसून आले.शीतलचे वडील काशीनाथ केदार यांनी दिलेल्या तक्रारी वरून शारीरिक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीतलचा नवरा सूरज रामराव भांगे, सासू कांचन रामराव भांगे, सासरा रामराव शामराव भांगे, चुलत दीर विलास मुरलीधर भांगे, चुलत सासू रुक्मिणी विलास भांगे आणि चुलत पुतण्या किरण विलास भांगे (सर्व रा. डोका, ता. केज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले आणि पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.समजूत काढून पाठवले होते सासरीविवाहिता ही दिवाळीपासून माहेरी राहत होती. संक्रांतीनंतर आई-वडिलांनी समजूत काढून तिला सासरी पाठवले होते.मात्र, त्याच दिवशी रात्री विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. रात्री उशिरा माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी पोहचले.
संध्याकाळी सासरी गेलेल्या विवाहितेची रात्री आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:55 PM
लग्नातील हुंड्याचे पैसे घेऊन ये म्हणून सासरचे लोक मारहाण व मानसिक छळ करीत असल्याने त्यांच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ठळक मुद्देपती, सासू-सासऱ्यासह सहा जणांवर गुन्हा : हुंड्यातील पैशावरून सुरू होता छळ