गेवराई : बँकेच्या व खाजगी सावकाराच्या कर्जास कंटाळून एका ३० वर्षीय शेतकऱ्याने घरातील पत्राच्या आडुला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या ( Farmer Suicide ) केल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील बागपिंपळगाव येथे घडली. रमेश नामदेव पिंगळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील बागपिंपळगाव येथील रहिवासी रमेश नामदेव पिंगळे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्याकडे बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज होते. त्यांची आई नातेवाइकाकडे गावी गेलेली होते व वडील खाजगी जागेवर सुरक्षारक्षक म्हणून कामाला गेले होते. तर लहान मुलगा व पत्नी आपल्या माहेरी गेले होती. याचा फायदा घेऊन त्यांनी गुरुवार रोजी सकाळी घरातील पत्राच्या आडुला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली.
सकाळी वडील सुरक्षारक्षकाचे काम करुन घरी आल्यावर रमेश पिंगळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी तात्काळ यांची माहिती गावकऱ्यांना देताच गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती गेवराई पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा, पत्नी,आई, वडील असा परिवार आहे.