गेवराई : सासरकडून नेहमी होणाऱ्या छळातून पंचमीला माहेरी पाठविले नाही, त्यामुळे कंटाळून विवाहितेने स्वत:च्या दीड वर्षाच्या तान्हुल्याला सोबत घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. गेवराई तालुक्यातील चोरपुरी येथे मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयत विवाहितेचा पती, सासू आणि सास-यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील चोरपुरी येथील शीतल सुदर्शन गंडे (२७) हिचे लग्न तीन वर्षापूर्वी सुदर्शन सावळीराम गंडे याच्यासोबत झाले होते. सुरूवातीचे सहा महिने चांगले नांदविल्यानंतर शेतात विहीर खोदण्यासाठी आणि पाईपलाईन करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत पती सुदर्शन, सासरा सावळीराम आणि सासू सुनीता यांनी शीतलचा छळ सुरु केला. तिला शिवीगाळ, मारहाण करून उपाशी ठेवण्यात येत होते.
सासरकडून होत असलेल्या या जाचाची माहिती शीतलने आई आणि भावाच्या कानावर घातली. त्यांनी शीतलची समजूत घातली आणि आर्थिक क्षमता नसतानाही कसेबसे ७५ हजार रुपये जमा करून तिच्या सासरच्या लोकांना दिले. यापेक्षा अधिक आमची आर्थिक क्षमता नाही, असे म्हणत बहिणीला चांगले नांदवा अशी विनंती भाऊ अन्साराम वाघमोडे याने केली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सासरच्या लोकांनी उर्वरित पैशासाठी तगादा लावत सृून शीतलचा छळ सुरु केला.
आठ दिवसांपूर्वी अन्साराम वाघमोडे यांनी नागपंचमीसाठी बहिणीला पाठवा अशी विनंती सासरच्या मंडळींकडे करूनही तिला माहेरी पाठविण्यात आले नाही. सासरकडून नेहमी होणाºया छळाला कंटाळून सोमवारी (दि.१३) सकाळपासून शीतल लेकरासह बेपत्ता झाली. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे माहेरच्या लोकांनी सायंकाळी चोरपुरी येथे धाव घेत शीतलचा शोध सुरु केला. अखेर मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतातील विहिरीत शीतल आणि तिच्या दीड वर्षाच्या बाळाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत विहिरीतून माय-लेकाचे मृतदेह बाहेर काढले.
याप्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ अन्साराम वाघमोडे याच्या फिर्यादीवरून पती सुदर्शन गंडे, सासरा सावळीराम सूर्यभान गंडे आणि सासू सुनीता गंडे या तिघांवर चकलांबा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.