केज : तालुक्यातील नाव्होली येथे एका विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक जाचास कंटाळून राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून पती, सासरा व दिराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिसेगाव येथील सायसराव लांडगे यांची मुलगी कल्पना हिचे लग्न २०१४ मध्ये नाव्होली येथील दत्तात्रय ऊर्फ भुजंग झाडे याच्यासोबत झाले होते. तिला साडेतीन वर्षांचा वैष्णव हा मुलगा व तीन महिन्यांची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. कल्पना हिला तिच्या सासरचे लोक शेतात बोअर व मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी सतत मागणी करत शारीरिक व मानसिक छळ व मारहाण करत होते. या सर्व त्रासाला कंटाळून कल्पना हिने १८ ऑगस्ट रोजी मंगळवारी पहाटेच्या सुमारास घरातील लोखंडी आड्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी मयत कल्पनाचा भाऊ अंकुश लांडगे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात पती दत्तात्रय ऊर्फ भुजंग माणिक झाडे, सासरा माणिक विठ्ठल झाडे व दीर गोरख ऊर्फ पोपट माणिक झाडे या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सपोनि वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. नांदूर घाट दूरक्षेत्र पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, कर्मचारी शिवाजी सानप यांनी सासरा माणिक झाडे यास ताब्यात घेतले, तर दीर गोरख ऊर्फ पोपट झाडे याला काळेगाव घाट आणि नवरा दत्तात्रय ऊर्फ भुजंग झाडे यास मस्साजोग येथून पोलीस नाईक अमोल गायकवाड यांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे करीत आहेत.
खून केल्याचा आरोप
विवाहितेची आत्महत्या नसून खून केल्याचा आरोप करीत मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
180821\1748-img-20210818-wa0046.jpg
मयत कल्पना झाडे