गेवराई : जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या एका कैद्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना ६ मार्च रोजी मध्यरात्री शहरातील माऊलीनगर येथे घडली. ७ मार्च रोजी सकाळी हा प्रकार उजेडात आला. सुनील दामोदर गायकवाड (४९, रा. माऊलीनगर, गेवराई) असे मयत कैद्याचे नाव आहे. झोपेत कात्रीने पत्नी व दोन मुलांवर त्याने हल्ला चढविला होता. यात पत्नी व मुलाचा मृत्यू झाला होता, तर मुलगी वाचली होती. या प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो पॅरोलच्या रजेवर आला होता.
सध्या पोटाच्या आजाराने ताे त्रस्त होता. त्यामुळे तो निराश होता. यातून दि. ६ रोजी मध्यरात्री घरातील दुसऱ्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी झोपेतून जाग आल्यावर कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब आली. पोलीस अंमलदार नवनाथ गोरे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. गेवराई ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.