बीड : २०२० या वर्षातील खरीप हंगमात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, ७२ तासांच्या आत विमा कंपनीला यासंदर्भात माहिती न दिल्यामुळे १७ लाख शेतकरी सभासदांपैकी फक्त २० हजार शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली होती. त्यामुळे शासकीय पंचनाम्यानुसार विमा देण्यात यावा, अशी विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात आली होती. त्याचा विचार करून ‘एनडीआरएफ’च्या नुकसान याद्यानुसार विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा विचार शासनस्तरावरून झाला असून, त्यासाठी पुढील कार्यवाही जिल्हा प्रशासनस्तरावर सुरू करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि व ज्यांची नावे एनडीआरएफच्या मदतीच्या यादीत आहेत, त्यांच्यातील जे पीक विमाधारक असतील त्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारने विमा कंपनीला दिले आहेत. अशा शेतकऱ्यांची माहिती जमविण्याचे आदेश राज्याच्या कृषी आयुक्तांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्यावेळी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातील ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीला तातडीने सूचना दिली आणि ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले त्यांना काढणीपश्चात नुकसान म्हणून नुकसानभरपाई देण्यात आली. मात्र, लाखो शेतकरी विमा कंपनीला वेळेत सूचना देऊ शकले नव्हते. परिणामी असे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. या निर्णयामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासंदर्भात सरकारने विमा कंपनीला निर्देश दिले आहेत. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे महसूल विभागाने केले आहेत. अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफ (नैसर्गिक आपत्ती निधी)मधून मदत देण्यात आली आहे. आता तीच यादी ग्राह्य धरून यातील जे शेतकरी विमाधारक आहेत आणि ज्यांना अद्याप पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश सरकारने कंपनीला दिले आहेत. यासाठी अशा शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
असा होता २०२० मधील खरीप विमा आराखडा
विमा भरलेल्या शेतकरी सभासदांची संख्या १७ लाख ९१ हजार ५२२
शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम ६० कोटी ७२ लाख
राज्य सरकारने भरलेले पैसे ४०५ कोटी ९६ लाख
केंद्र सरकारने भरलेले पैसे ३३९ कोटी ८९ लाख
विमा मिळालेली रक्कम १३ कोटी
विमा मिळालेले शेतकरी सभासद १९ हजार ३४४
विमा न मिळालेल्या शेतकरी सभासद १७ लाख ७२ हजार
कृषी आयुक्तांच्या पत्रानुसार जिल्हा प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची पडताळणी करण्यात येत असून, लवकरच शासनाकडे नुकसान होऊनदेखील लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठविण्यात येईल.
जिल्हाधिकारी बीड