शिरूर कासार : सतत दुष्काळ आणि पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या शिरूर तालुक्यात यंदा पाण्याच्या उपलब्धतेमुळे येथील शिवार हिरवेगार दिसत आहे. शेतकऱ्यांनी ‘कोरोना कोरोना’ करत बसण्याऐवजी उन्हाळी हंगाम घेण्याची संधी साधली आहे. तालुक्यातील तीन मंडळाअंतर्गत जवळपास साडेअकरा हजार एकरांवर उन्हाळी बाजरी, भुईमूग, उडीद तसेच तीळ ही पिके डोलत आहेत. कोरोना महामारीने संपूर्ण जग वेठीस धरले. याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. मागील वर्षी लाॅकडाऊन लागू झाला आणि सारे अर्थचक्र थांबले होते. मजूर, शेतकरी, व्यापारी आणि उद्योग, नोकरीवाल्यांसह सर्वांना डांबून ठेवले होते. परिस्थिती आजही नाजूकच आहे. गतवर्षी कोरोनामुळे बरेच काही गमावले असले तरी पावसाने मात्र भरपूर मेहरनजर केली. सर्व नद्या, ओढे, नाले, विहिरींसह छोटे आणि मोठे जलाशयसुद्धा ओसंडून वाहत होते. आणि म्हणूनच कडकडीत उन्हाळ्यात पाणी शिल्लक आहे. उपलब्ध पाण्याचा वापर व गतवर्षीची तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘कोरोना कोरोना’ करत बसण्याऐवजी उन्हाळी हंगाम घेण्याची संधी साधली. परिणामी तालुका हिरवागार दिसत आहे. तालुक्यात कोरोनाच्या दुख:वर उन्हाळी हंगाम हलकीशी सुखद फुंकर घालत असल्याचे चित्र दिसत आहे. हिरव्यागार पिकाकडे पाहिल्यावर शेतकऱ्याचा उर भरून येतो. त्याला तात्पुरता का होईना कोरोनाचा विसर पडतो. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शक्यतो सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा रात्री पिकाला पाणी देणे फायदेशीर असल्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.
उन्हाळी फळे, पिकांकडे कल
तालुका कृषी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार उन्हाळी बाजरी २४३९ हेक्टर, भुईमूग १३३४ हेक्टर, मूग ३१८ हेक्टर, उडीद २८७ हेक्टर तर तीळ १३८ हेक्टर असल्याची नोंद आहे. याशिवाय ऊस, मका तसेच भाजीपाला, फळबागा आदी पिकेसुद्धा असल्याचे सांगण्यात आले.
पाणी असले तरी विजेची अडचण
पाणी असले तरी खंडित वीज पुरवठा मात्र शेतकऱ्यांना त्रासाचा ठरत आहे. त्याचे बदलते वेळापत्रक, त्यातही वारंवार पुरवठा खंडित होणे, रात्री बारा ते आठ ही वेळ म्हणजे शेतकऱ्यांना झोपेवर हातोडाच घालावा लागत आहे, सर्व जग गाढ झोपेत असतात शेतकरी रात्री पिकाला पाणी देत असतो.
===Photopath===
050421\img20210328171847_14.jpg