पुरुषोत्तम करवा
माजलगाव : मध्य प्रदेशातील २९ मजूर कामासाठी बीडच्या माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे आले होते. परंतु, मुकादमाने पैसे न दिल्याने त्यांची उपासमार होत होती. शिवाय परत गावीही जाता येत नव्हते. हा प्रकार ‘लोकमत’ने रविवारी समोर आणला. यावर प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सादोळ्यात धाव घेतली. या सर्व मजुरांना पैसे मिळवून देण्यासह त्यांच्या घरी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. या सर्वांना मंगळवारी गावी पाठविले जाणार आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील २९ मजूर महाराष्ट्रात ऊसतोडणी कामासाठी आले होते. तेथील दलालाने बीड जिल्ह्यातील मुकादमाकडून पैसे घेऊन मजूर पुरविण्याची बोली करून उचल घेतली होती. त्याप्रमाणे या मजुरांना एका टेम्पोतून महाराष्ट्राच्या सिमेवरील धारणी गावात सोडले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तीन कारखान्यांवर त्यांनी ऊसतोडणीचे काम केले. शेवटी हे मजूर सादोळा येथे ऊसतोडणीसाठी आले. त्यांना मजुरीचे पूर्ण पैसे देऊन त्यांना गावी पाठविण्याची बोली असतानादेखील मुकादमाने काहीच केले नाही. त्यामुळे हे मजूर अडकून पडले होते. शिवाय काम बंद केल्याने अन्नधान्यही मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची उपासमार होत होती. हाच प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला. त्यानंतर रविवारी सकाळीच समाज कल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी, बाल कल्याण समिती सदस्य तत्त्वशील कांबळे, बाल संरक्षण समिती सदस्य अशोक तांगडे, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी पुंडगे, सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल, राधाबाई सुरवसे यांनी गावात धाव घेतली. या सर्वांनी बैठक घेऊन हे प्रकरण मिटविले. कामाच्या मोबदल्याचे सर्व पैसे मजुरांना मिळवून देण्यात आले. त्यानंतर या सर्वांना मंगळवारी परभणीमधून रेल्वेने पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. मडावी यांनी सांगितले.
===Photopath===
140321\142_bed_14_14032021_14.jpeg~140321\142_bed_15_14032021_14.jpg
===Caption===
मध्यप्रदेशातील मजुरांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. यावेळी उपायुक्त डॉ.सचिन मडावी, तत्वशील कांबळे, अशोक तांगडे, सत्यभामा सौंदरमल.~लोकमतने रविवारी प्रकाशित केलेले वृत्त.