अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथील विमल सेवा प्रतिष्ठानने साडी चोळी व ब्लँकेट वाटप करून ६१ निराधार वृद्ध व महिलांना आधार दिला.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गिरवली येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते डाॅ. प्रल्हाद गुरव, भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, विमल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव पतंगे, जीवनआधार भक्तिप्रेम आश्रमाचे संचालक पवन सोमनाथअप्पा गिरवलकर, आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डाॅ. प्रल्हाद गुरव म्हणाले की, ग्रामीण भागात असा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. निराधार महिलांना आधार देण्याचे काम करणारे विमल सेवा प्रतिष्ठान हे आधुनिक काळातील श्रावणबाळ आहे. याप्रसंगी धनराज सोळंकी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात वसंतराव पतंगे यांनी विमल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण, पंचक्रोशीतील जनतेची आरोग्य तपासणी शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, आदी समाज उपयोगी, विधायक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. सचिन आपेट यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव सावरे यांनी आभार मानले.
यावेळी सरपंच कडुबाई आपेट, दत्तात्रय आपेट ,धनराज बावणे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथअप्पा गिरवलकर, सखाराम शिंदे, अनंत पवार, दत्ता आपेट, भागवत आपेट, राहुल लंगे, शिवराज आपेट, विनोद बुरांडे, अमोल आपेट, सुग्रीव आपेट, गोरोबा लंगे, संतोष चौधरी, प्रवीण पवार, प्रमोद चौधरी यांच्यासह महिला व गावकरी हे उपस्थित होते.