संजय खाकरे :
परळी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईत एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर परळीतील सामान्य माणूस, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मात्र प्रतिक्रिया दिल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप सूडबुद्धीतून केला असून परळीचे नेतृत्व संपू नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी अनेकांनी केले आहे.
महाराष्ट्राची शान
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीला आपण धनंजय मुंडे यांच्यावर आलेले संकट दूर कर म्हणून साकडे घातले आहे.
दीपक देशमुख, माजी नगराध्यक्ष परळी
धनंजय मुंडे यांनी परळीत दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्यात हजारो बहिणींचे कन्यादान केलेले आहे. गोरगरीब, परित्यक्ता, विधवा, अपंग, अशा महिलांचे व इतर लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. अशा जनसेवा करणाऱ्या नेतृत्वावर करण्यात आलेले आरोप हे खोटे असून लवकरच महाराष्ट्राला दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झालेले कळेल व सत्याचाच विजय होईल.
डॉ. संतोष मुंडे, परळी वैजनाथ
धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेला हा आरोप पूर्णत: खोटा आहे. स्त्रीला पुढे करून त्यांना गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांची उत्तुंग भरारी चालू असता राजकीय षड्यंत्र रचून त्यांना बदनाम केले जात आहे. त्यांची बदनामी थांबली पाहिजे.
- ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, परळी
धनंजय मुंडे यांचे नेतृत्व पुढे येत असताना त्यांच्यावर होत असलेला हा आरोप खोटा आहे व त्यांच्यावर अन्याय करणारा आहे, असे आपल्याला सामान्य महिला म्हणून वाटते-
अर्चना महिंद्र रोडे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी
धनंजय मुंडे यांच्यावर फूस लावून एका महिलेकडून करण्यात येत असलेला बलात्काराचा आरोप हा पूर्णत: खोटा आहे. या पाठीमागे राजकीय षड्यंत्र असू शकते. परळीचे नेतृत्व कमी होता कामा नये.
-राजाभाऊ निर्मळ पाटील, शेतकरी, हिवरा, तालुका परळी
धनंजय मुंडे हे निर्मळ व मोकळ्या मनाचे नेते आहेत. त्यांच्यावर आरोप करून फसविले जात आहे.
-महादेव निर्मळ शेतकरी, हिवरा
धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून बदनामी करणारे आहेत.
उमेश अग्रवाल, हॉटेल व्यावसायिक, परळी
परळीचे नेतृत्व मोठे होत असताना मुंडे यांच्यावर कटकारस्थान करून आरोप करण्यात येत आहे. हे आरोप खोटे आहेत.
-दिगंबर देवज्ञे, ज्येष्ठ नागरिक, परळी