लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले. त्यानंतर आता खुद्द आ. धसदेखील अशाच एका प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यांच्या सतीश भोसले नावाच्या कार्यकर्त्याने शिरूर तालुक्यात दहशत माजवली. एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचे दात पाडले. त्यानंतर जीपमधून जाताना त्याने पैशांचे बंडल फेकून देत माज दाखवला. दरम्यान धस यांनी भोसले हा आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे.
शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले आणि त्याच्या चार साथीदारांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला. त्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने दखल घेत भोसलेसह त्याच्या साथीदारांवर शिरूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर भोसले याचे अनेक व्हिडीओ समोर आले.
बीड,अहिल्यानगरमध्ये गुन्हे
सतीश भोसलेविरोधात बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ६ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो एका वाहनातून प्रवास करत असताना ५००, २०० रुपयांचे बंडल गाडीच्या समोरील काचाजवळ फेकताना दिसत आहेत.
‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळख
सतीश भोसले याच्या गळ्यात आणि हातात किलोभर सोने असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हेलिकॉप्टरमधून उतरताना, महागड्या वाहनांमधून रुबाबात प्रवास करतानाचेही त्याचे व्हिडीओ आहेत. ‘गोल्डन मॅन’ म्हणून त्याची ओळख आहे.
माझाच कार्यकर्ता : धस
भोसले हा माझाच कार्यकर्ता असल्याची कबुली आ. धस यांनी दिली आहे. मुलीच्या छेडछाडीवरून ही मारहाण झाली होती. व्हिडीओ दीड वर्षांपूर्वीचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.