BJP Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस हे गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत आहेत. आधी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात उठवलेली आरोपांची राळ आणि नंतर त्यांची भेट घेतल्याने आमदार धस यांच्यावर टीकेच झोड उठली. धस यांची धनंजय मुंडेंसोबत सेटलमेंट झाली आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र या सर्व आरोपांनंतर सुरेश धस हे आता आणखीनच आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंना कोंडीत पकडण्यासाठी धस यांनी नवीन अस्त्र बाहेर काढलं आहे.
धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना कृषी विभागाच्या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा सुरेश धस यांना संशय आहे. त्यामुळे २०२० ते २०२५ या कालावधीत कापूस, सोयाबीनसह तेलबीयांची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी खात्याकडून करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची धस यांनी माहिती मागवली आहे. या माहितीच्या आधारे आगामी काळात सुरेश धसांकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कृषी खात्याच्या पत्रव्यवहारातून नेमकी काय माहिती समोर येते आणि सुरेश धस या प्रकरणात कसा आवाज उठवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुरेश धस यांनी कोणते संकेत दिले?
सेटलमेंटचे आरोप झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना सुरेश धस यांनी म्हटलं आहे की, "मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या प्रकरणावरून षडयंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश करणार आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालेल. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. तसंच अन्य काही गोष्टी मी पुढे बाहेर काढणार आहे," असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.