बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेतल्यानंतर लाभार्थी आशा, अंगणवाडी सेविकांना जमिनीवर बसविल्याची बाब ‘लोकमत’ने शुक्रवारी समोर आणली होती. यावर आरोग्य विभागाने त्या महिला दिव्यांग असल्याने आणि खुर्चीवर बसता येत नसल्याने खाली बसल्याचा खुलासा केला आहे. वास्तविक पाहता त्या महिला दिव्यांग नसल्याचे समोर आले आहे. केवळ आपली चूक झाकण्यासाठी असा खोटारडेपणा केल्याचे दिसत आहे. याबाबत ब्रदर व आशाताईचा व्हिडिओदेखील बनवला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. जिल्ह्यात ९ ठिकाणी लसीकरण केंद्र बनविले आहेत. जिल्हा रुग्णालयातही हे केंद्र आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमिवर ड्राय रन घेण्यात आला. यात नियोजनाचा बोभाटा केला होता. याची गुरुवारी लोकमतने रिॲलिटी चेक केली असता, लस घेतल्यानंतर महिलांना बसण्यासाठी खूर्च्या नव्हत्या. त्यांना जमिनीवर बसविल्याचे दिसले. खाली बसलेल्या महिला या आशाताई व अंगणवाडी सेविका होत्या. तर दुसऱ्या बाजूला सायंकाळच्या वेळेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना लस घेतली. त्यांच्यासाठी मात्र सर्व व्यवस्था करण्यात आली होती. या निमित्ताने हा दुजाभावही दिसून आला होता.
दरम्यान, खाली बसलेल्या महिलांचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच यंत्रणा सतर्क झाली. यावर खुलासा म्हणून कर्तव्यावर ब्रदर व आशाताईचा व्हिडिओ तयार करून खुलासा स्वरूपात दिला. त्यात त्या अपंग असल्याने खाली बसल्याचे सांगण्यात आले. यावर ‘लोकमत’ने फोटोतील महिलांशी संपर्क केला असता आपण धडधाकट असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून आरोग्य विभागाचा खोटारडेपणा उघड झाला.
सीएस म्हणाले की, खात्री करावी लागेल.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्याशी शुक्रवारी पुन्हा संपर्क केला. यावर त्यांनी लसीकरणानंतर खाली बसलेल्या महिला दिव्यांग होत्या. त्यांना खुर्चीवर बसता येत नव्हते, असे सांगणारे दोन व्हिडिओ पाठविले. यावर ‘लोकमत’ने त्या दिव्यांग नसल्याचे समजत असल्याचे बोलल्यावर खात्री करावी लागेल, असे उत्तर त्यांनी दिले, तसेच लोकमतने फोटोतील पिंपरी तांडा येथील लीला जाधव व जुजगव्हाण येथील सखुमिरा सुरवसे यांच्याशी संपर्क केला. यावर त्यांनी आपण स्वत:हून मैत्रिणीसोबत खाली बसल्याचे सांगितले; परंतु अपंग नाहीत, असेही त्या म्हणाल्या.