माझा गांव -सुंदर गाव अभियान : गाव विकासासाठी केले मार्गदर्शन
बीड : तालुक्यातील धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आदर्श, स्मार्ट गांव कोळवाडी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मंगळवारी अचानक भेट देऊन ‘माझा गांव -सुंदर गाव’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय पातळीवर पुरस्कार मिळविणारी कोळवाडी गावातील लोकाभिमुख उपक्रमांसाठी आदर्श ठरली आहे. जिल्ह्यात २२ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत माझा गांव - सुंदर गांव अभियान सुरू आहे. या अभियानात कोळवाडी येथे जाेरदार तयारी सुरू आहे.शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुभांर यांनी गावात भेट दिली. या अभियानाच्या कालावधीत गाव स्तरावरील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना आदी शासकीय कार्यालयातील अभिलेखे अद्यावतीकरण व वर्गीकरण, रंगरंगोटी, स्वच्छता अभियान, ग्रामपंचायतची १०० टक्के कर वसुली, खुली व्यायाम शाळा, शाळेसाठी क्रीडांगण, वन्य जिवांसाठी पाणवठा, घनवृक्ष लागवड व इतर नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याबाबत कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जि.प.प्रा.शाळेच्या हंगामी वसतिगृहाला भेट देऊन तेथील विद्यार्थ्याशी चर्चा केली. विद्यार्थ्याना जेवण दर्जेदार मिळत असल्याची व बायोमेट्रीकवर विद्यार्थ्याची उपस्थितीची नोंद घेण्यात येत असल्याची त्यांनी खात्री केली. या अभियानासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी कोळवाडी येथील अंगणवाडी दत्तक घेतली असून जवळपास ९० टक्के काम पुर्ण करण्यात आले आहे. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे , अंगणवाडी पर्यवेक्षिका रणदिवे, ग्रामसेवक सखाराम काशिद, जि.प.प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका कदम, सर्व शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनीस व नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.