कडा (जि. बीड) : आपल्या मुलीसोबत प्रेमसंंबंध असल्याच्या संशयावरून ट्रकचालक तरुणास पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत वायरने बेदम मारहाण केली. यात चालक तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्याप्रमाणेच मृत तरुणाचेही फोटो व्हायरल झाले आहेत.
विकास अण्णा बनसोडे (वय २३, रा. बोरगाव, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे मागील तीन वर्षांपासून विकास हा ट्रकचालक म्हणून काम करत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढले होते. विकास हा पिंपरी गावात मित्रासह दोन दिवसांपूर्वी आला होता. याचदरम्यान विकास व भाऊसाहेब यांच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून दोरी व वायरच्या साह्याने विकासला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवला होता. पण नातेवाइकांनी येथे शवविच्छेदन न करता छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात करावे, अशी मागणी केल्याने मृतदेह छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मृताचा भाऊ आकाश अण्णा बनसोडे याच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पुढील तपास आष्टीचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे करीत आहेत.
यांनी घेतली घटनास्थळी धावआष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवाडे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलिस हवालदार प्रवीण क्षीरसागर, पोलिस अंमलदार दीपक भोजे, बिभीषण गुजर, सचिन पवळ आदींनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपींना फाशी द्याराज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. क्रूरपणे दलित तरुणाचे हत्याकांड झाले आहे. आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे.
लवकर या इथं, आल्यानंतर सांगतो काय झालं ते...मुलाला दोन दिवस बेदम मारहाण करत असताना मृताच्या फोनवरून त्याच्या आई-वडिलांना फोन करून लवकर या इथं, आल्यानंतर सांगतो काय झालं ते, असे मोबाइलवरून संभाषण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मृतदेह रुग्णालयात ठेवून आरोपींचे पलायनमारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे कळताच दोघाजणांनी एका चारचाकी वाहनातून मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवला आणि निघून गेले. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहन थांबायचा प्रयत्न केला; पण वाहनचालक न थांबता निघून गेला.
तीन दिवसांत दोन खूनाच्या घटनाआष्टी तालुक्यातील जामगांव येथील धनू रणसिंग दामू यांचा दोघाजणांनी गळा आवळून खून केल्याची घटना १३ मार्च घडली होती. त्यानंतर तीनच दिवसात पिंपरी (घुमरी)येथील एका कुटुंबातील लोकांनी ट्रक चालकाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.
आरोपींमध्ये यांचा समावेशभाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भानुदास क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर, (सर्व रा. पिंपरी घुमरी, ता. आष्टी), संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे, बापूराव शिंदे अशा दहा जणांवर कलम १०३ (१), १८९(२), १९१(२), १९०, भारतीय न्याय संहिता २०२३, सह कलम ३(२),(va),३(२)(v) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.