- सोमनाथ खताळबीड : वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अपघातील मयत झालेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहाची तब्बल १५ तास हेळसांड झाली होती. या प्रकरणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार 'लोकमत'ने उघड केला होता. त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबणासाठी अख्खे कुप्पा गाव एकवटले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला होता.
याप्रकरणाची आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त एन.रामास्वामी संचालिक डॉ.साधना तायडे आणि उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी गंभीर दखल घेतली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे, साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे, संदीपान मांडवे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता.
यात आयुक्तांनी कुप्पा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजूश्री दुल्लरवार व डॉ.शितल जाधव यांचे निलंबन करण्याचे आदेश उपसंचालकांना दिले. त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी उपसंचालक कार्यालयातून या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबण झाल्याचा अहवाल बीड आरोग्य विभागाला दिला आहे. याकारवाईने डॉक्टर मुख्यालयी राहुन सेवा देत नसल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. --