: कळंब रस्त्यालगतच्या गव्हाच्या शेतात २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, मयताच्या मोबाइलवरून त्याची ओळख पटली असून हा तरुण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील सावरगाव भागातील राहणारा असून त्याचे नाव लखन महादेव सोनवणे असे आहे. तो इमारतींना रंग देण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
केज-कळंब रस्त्यावरील साळेगाव ते माळेगावदरम्यान तुकाराम गुंठाळ यांच्या सर्व्हे नं. ४१ मधील पेरूच्या बागेजवळ असलेल्या गव्हाच्या शेतात एक २८ वर्षे वयाच्या इसमाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला आहे. तुकाराम गुंठाळ हे सकाळी शेतात गेले असता त्यांनी याची माहिती युसूफ वडगाव पोलीस ठाण्यास दिली. सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे व विजय आटोळे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक पालवे आणि सीमा कोळी यांच्यासह बाळासाहेब ढाकणे, खनपटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वैभव राऊत व पप्पू अहंकारे हे घटनास्थळी हजर झाले. मृतदेह व घटनास्थळाची माहिती घेतली असता त्याच्या डोक्यास मागील बाजूने मार लागलेला असून पाठीवर आणि मानेवर मारहाणीच्या पुसटशा खुणा दिसून आल्या. कानातूनही रक्त आलेले होते. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह युसूफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला असून हा घात की अपघात, याचा तपास पोलीस घेत आहेत.