बीड/परळी: भल्या पहाटे रस्त्यावरून निघालेल्या वृद्धाचे दुर्गंधीने लक्ष विचलित झाले. आजूबाजूला पाहिले तर रस्त्याच्या कडेला एक पांढरे पोते आढळले. सुरुवातीला हे काहीतरी आक्रित असावे, असे समजून त्यांच्या काळजात धस्स झाले. त्यांनी थेट ठाणेप्रमुखांना फोन करून कळविले. त्यामुळे पोलीस यंत्रणाही कामाला लागली, पण या पोत्यात मेलेली वगार आढळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
परळी- धर्मापुरी रस्त्यावरील सारडगाव येथील घाटानजीक २५ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. झाले असे, सारडगाव येथील ज्येष्ठ नागरिक रामराव आघाव हे पहाटे रस्त्यावरून जात होते. दूरदूरपर्यंत सुटलेली दुर्गंधी त्यांना पांढऱ्या पोत्याजवळ घेऊन गेली. हे पोते दोरीने बांधलेले होते. त्यामुळे आत काय असावे, याचा अंदाज बांधणे कठीण होते, पण शंकाकुशंकांनी रामराव आघाव यांना अक्षरश: घाम फुटला. त्यांनी मोबाइलवरून परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांना याबाबत कळविले. त्यानंतर मुंडे हे तातडीने पोलीस वाहनातून सारडगाव गाठण्यासाठी निघाले. मात्र, वाटेत असतानाच मारुती मुंडे यांच्या सूचनेवरून रामराव आघाव यांनी पोते उघडून पाहिले तेव्हा मेलेली वगार आढळली अन् त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शेतकऱ्याने पोत्यात बांधून ती रस्त्यालगत फेकली असावी.
...
ठाणे डायरीत नोंद
घडल्या प्रकाराने आघाव यांची तारांबळ उडाली तर पोलिसांनाही नाहक कामाला लागावे लागले. असे असले तरी संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर पोलिसांना कळविल्याबद्दल रामराव आघाव यांचे आभार मानण्यास मारुती मुंडे विसरले नाहीत. शिवाय, ठाणे डायरीतही त्यांनी नोंद घेतली.
250821\25bed_18_25082021_14.jpg
पोते