अंबाजोगाई : राष्ट्राला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रेरक ठरतील़, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.
येथील कृषी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी मोदी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते. तर व्यासपीठावर दत्तात्रय दमकोंडवार , डाॅ. अरुण कदम, जिमखाना उपाध्यक्ष डाॅ. प्रताप नाळवंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मोदी म्हणाले, कृषी महाविद्यालयातील हा ‘राष्ट्रीय युवा सप्ताह’ म्हणजे विचारांचा जागर आहे. अशा शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमातूनच आजचे युवक उद्याचे कर्तव्यदक्ष, आदर्श आणि चांगले नागरिक निर्माण होतील. कृषिच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान राखून, जाणिवेतून आणि सामाजिक बांधिलकीतून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य करावे, असे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले. प्रारंभी विद्यार्थी प्रतिनिधी माधुरी करडे हिने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सहयोगी प्राध्यापक डाॅ. दीपक लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन कवी राजेश रेवले यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बसवलिंगआप्पा कलालबंडी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुनील गलांडे, डाॅ. सुहास जाधव, डाॅ. नरेंद्र कांबळे, डाॅ. नरेशकुमार जायेवार, डाॅ. विद्या तायडे, डाॅ. योगेश वाघमारे, अनंत मुंढे, सुनिल गिरी, मनीषा बगाडे, माया भिकाणे, यादव पाटील, इरफान पठाण, स्वप्नील शिल्लार, नंदकुमार मोरे व प्रकाश मुजमुले यांनी परिश्रम घेतले.