बीड : पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बीड शहरापासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात १६ एप्रिल रोजी सांयकाळी उघडकीस आली. दोन तास शोध मोहिमेनंतर तिघांचे मृतदेह खदाणीतून बाहेर काढण्यात आले.
बीड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओम गणेश जाधव (वय १७ रा. गांधीनगर बीड), शाम सुंदर देशमुख (वय १७ रा. राजीव नगर बीड ), मयुर राजेंद्र गायकवाड (वय १४ रा. गांधीनगर बीड) असे खदाणीत बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. ते तिघेही दुचाकीवरून सकाळी ११ वाजता पोहण्यासाठी बीड शहराजवळील बायपासरोडलगत असलेल्या पांगरबावडी शिवारातील खदाणीत गेले होते. दरम्यान उशिरपर्यंत घरी न आल्यामुळे घरच्यांची त्यांचा शोध घेतला. यावेळी खदाणीकडे नेहमी पोहण्यासाठी ते जात असल्यामुळे याठिकाणी पाहणी केली असता खदाणीच्या काठावर कपडे व दुचाकी आढळून आली. त्यानंतर तात्काळ याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. त्यांच्या मदतीने खदाणीत सायंकाळी शोध सुरु केला. तब्बल दोन तासांच्या शोध मेहिमेनंतर तिघांचे मृतदेह खदानीतून बाहेर काढण्यात आले.
घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि.संतोष साबळे, सपोनि.योगेश उबाळे, पोउपनि पवनकुमार राजपुत, रोटे, पोह. आनंद मस्के, राऊत, सानप, दुबाले, जायभाये, तांदळे आदींची उपस्थिती होती. याप्रकरणी पंचनामा करून ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. तर, अग्निशमन दलाच्या वतीने आर.वाय आदमाने, जी.बी ढोकणे, साबळे, प्रदीप वडमारे या जवानांनी मृतदेह खदानीतून बाहेर काढण्याची कार्यवाही केली. खदाणीत मुले बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर नातेवाईकांनी मोठ्या संख्येने खदाणीकडे धाव घेतली होती. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहिमेत मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी एकच टाहो फोडत आक्रोश केला.