लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील गैरप्रकाराची आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. लातूरचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांना या प्रकाराची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटीच्या नावाखाली १२ लाखांची उधळपट्टी करणे अंगलट आले आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग कार्यरत आहे. येथे डॉ. सुदाम मोगले या मानसोपचारतज्ज्ञासह चार ते पाच कर्मचारी कार्यरत आहेत; परंतु मागीत तीन वर्षांत त्यांनी ३८८ पैकी केवळ ५३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली, तसेच समुपदेशन व इतर कारणांच्या नावाखाली वाहनांवर तब्बल १२ लाख ६३ हजार रुपयांची उधळपट्टी केली होती. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने शुक्रवारी चव्हाट्यावर आणला. त्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांनी या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच उपसंचालकांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
--
दांडीबहाद्दर विभागप्रमुखांवर कारवाई
प्रकल्प प्रेरणा विभागाचे प्रमुख मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुदाम मोगले आहेत. परंतू ते कायम गायब असतात. दोन दिवसांपासून ओपीडीला विनापरवानगी दांडी मारल्याने त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाईही झाली आहे. यावरून त्यांच्या कामचुकारपणाला दुजाेरा मिळाला आहे. डॉ. मोगले यांच्या स्वाक्षरीनेचे हे १२ लाख रुपये उधळण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
---
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार
या सर्व प्रकाराची सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री, आरोग्य आयुक्त, सचिव, संचालक, उपसंचालक या सर्वांकडे नावानिशी तक्रार केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याची दखल घेऊन संबंधिताला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
---
बीडमधील प्रकार गंभीर आहे. या पूर्ण प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना उपसंचालक व सीएसला देते. दोषींवर कारवाई केली जाईल.
-डॉ. साधना तायडे, संचालिका, आरोग्य विभाग
---
बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागाबद्दल चौकशीच्या सूचना संचालकांकडून मिळाल्या आहेत. लवकरच कारवाई केली जाईल.
-डॉ. एकनाथ माले, उपसंचालक, लातूर