लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या डोक्यावर दोन वर्षांपासून अपात्रतेचे संकट घोंगावत आहे. याचा निकाल लवकर लागण्याची शक्यता असून शासनाच्या नगर विकास खात्याने कारणे दाखवा नोटीस पाठवून १५ दिवसात खुलासा मागविला आहे. चाऊस यांना एका गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई हाण्याचे संकेत आहेत.तीन वर्षांपूर्वी माजलगाव नगर पालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत विकास आघाडीचे उमेदवार म्हणून चाऊस हे नगराध्यक्षपदी निवडून आले होते.दरम्यान सहाल चाऊस यांना निवडणुकीपूर्वी न्यायालयाने सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली असल्याने त्यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र करण्याची मागणी येथील शेख आयुब शेख शबीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.यावर सहाल चाऊस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या खुलाश्यात आपण या शिक्षेची सर्व माहिती नामनिर्देश पत्रात नमूद केली होती. यावर निवडणुकीच्या अर्ज छाननीत कोणीही आक्षेप घेतला नाही. तसेच याबाबत सत्र न्यायालयात १० डिसेंबर २०१४ रोजी अपील केल्याचे म्हटले होते. यावर सखोल चौकशीनंतर जिल्हाधिका-यांनी ५ आॅक्टोबर २०१८ रोजी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना अहवाल पाठविला. माजलगाव येथील प्रथवर्ग न्यायालयाने फौजदारी प्रकरण क्र मांक १३०/ २००८ मध्ये १४ नोव्हेंबर २०१४ रोजी निकाल देऊन सहाल चाऊस यांना सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व ५०० रु पये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.तसेच सत्र न्यायालयाने अपिलामध्ये १० डिसेंबर २०१४ रोजीच्या आदेशात चाऊस यांना झालेली शिक्षा अंतिम निकाल निघेपर्यंत स्थगित करून ५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला असला तरी न्यायालयाने अपराध सिद्धतेस स्थगिती दिलेली नाही.तसेच शासनाने चाऊस यांना अनेकदा संधी देऊनही सबळ पुरावा सादर केला नाही. यामुळे त्यांना दिलेली शिक्षा व त्यांचे गैर कृत्य हे नैतिक अध:पतन यामध्ये येत असल्याने महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम १६ (१)(एसी) अन्वये चाऊस हे कलाम ४४ (१)(ए) अन्वये अपात्र असल्याचे या अहवालात नमूद केले होते. जवळपास एक वर्षानंतर २० सप्टेंबर २०१९ रोजी नगरविकास खात्याने नगराध्यक्ष सहालबिन आमेर चाऊस यांना या प्रकरणात क्र. एमयूएन ५५१८/ प्र.क्र .१७३ / नवी१५ नुसार महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमानुसार कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. याबाबत १५ दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.नगराध्यक्ष सहाल चाऊस हे नगर परिषद निवडणुकीत भाजप पुरस्कृत म्हणून निवडून आले असल्याने तीन वर्ष त्यांनी भाजपचे नगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. असे असताना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना अपात्रतेबाबत आलेल्या कारणे दाखवा नोटीसमुळे माजलगावच्या राजकीय गोटात चर्चेला उधाण आले आहे.
नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:12 AM