माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन ग्रामपंचायतने तोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दप्तरापेक्षा पाण्यानेच ओझे वाहण्याची वेळ आल्यामुळे विध्यार्थ्यांनी शाळेत प्यायला द्या म्हणत थेट पंचायत समितीसमोर आर्त टाहो फोडला. शाळा प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात असलेल्या सुंदोपसुंदीत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड यामुळे विद्यार्थ्यांचे रौद्ररूप पंचायत समिती आवारात बुधवारी पहावयास मिळाले. रात्री उशिरापर्यंत मुलांचे आंदोलन सुरुच होते.ग्रामपंचायत मंजरथ ही मागील ग्रामपंचायत निवडणुकीपासून कायम वादातीत असून, या-ना त्या कारणामुळे सातत्याने ग्रामपंचायतच्या कारभारावरून खटके उडत आहेत. सरपंच ऋतुजा आनंदगावकर या एका कंपनीत काम करीत असून, त्या कधीच गावात हजर नसतात. त्यांच्या जागी त्यांचे वडील राजेंद्र आनंदगावकर हेच काम पाहत असल्याने ग्रामपंचायतचा कारभार पार ढासळल्याचा आरोप विरोधक कायम करीत असतात. सरपंचानी एकतर नोकरी करावी किंवा राजकारण करावे. सरपंच जागेवर नसल्यामुळे ग्रामपंचायतच्या प्रत्येक कामात त्यांच्या नातेवाईकांकडून होत असलेली मनमानी वादास कारणीभूत ठरत असल्याचे आरोप होत असतात. तसेच पूर्वीच्या ग्रा.प. पदाधिकाऱ्यांचे उणेदुणे काढण्यासाठी नियमावर बोट ठेवून सरपंच नवनवीन वाद उपस्थित करीत असल्याचाही आरोप होतो. दुसरीकडे सरपंच या अॅरोनॉटिकल इंजिनिअर आणि त्यांचे वडील तसेच आई हे उच्चशिक्षित असल्याने प्रत्येक काम हे नियमानुसारच होईल, यासाठी आग्रही असल्याचे त्या सांगतात. त्यामुळे गावकीचा हा वाद काही करता मिटत नसला तरी या सर्व प्रकाराची सामाजिक कार्याला लागण झाली नव्हती. मात्र महिन्यापूर्वी येथील गोदावरी विद्यालयाचे नळ कनेक्शन ग्रा.पं. ने तोडले त्याला सदरील कनेक्शन हे अनधिकृत असल्याचा निर्वाळा सरपंच यांनी दिला. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची पाण्याअभावी हेळसांड सुरू झाली. या शाळेत शिकणारे ६० ते ७० टक्के विद्यार्थी हे आजूबाजूच्या गावांमधून तसेच वाड्या, वस्तीवरून येतात. दप्तरासोबत चार ते पाच लिटर पाणी देखील त्यांना वागवावे लागत असल्याने मुलांना चक्कर येणे, उलट्या होणे असे प्रकार घडू लागल्यामुळे पालक देखील चिंतातुर झाले. मागील महिन्यापासून चाललेल्या या प्रकाराला अखेर बुधवारी तोंड फुटले आणि या शाळेचे विद्यार्थी आणि पालकांनी थेट पंचायत समितीसमोर आम्हाला पाणी द्या म्हणत आर्त टाहो फोडला. यामुळे पंचायत समिती आवारात एकच धांदल उडाली. चार तास हा गोंधळ सुरू होता. यावेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, पोनि सय्यद सुलेमान, उपसभापती डॉ. वसीम मनसबदार यांनी मानवीय दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने नळ सुरू करून देऊन कागदोपत्री पूर्तता करून घ्यावी, अशी मध्यस्थी केली. मात्र सरपंचांनी या लोकांना न जुमानता अधिकृत मागणी झाल्याशिवाय नळ सुरू करण्यात येणार नाही, अशी हेकेखोर भूमिका घेत तेथून काढता पाय घेतल्यामुळे शेवटी गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकास नळ जोडणे तसेच कागदपत्रांची रीतसर पूर्तता करून घेण्याचा आदेश द्यावा लागला. यावेळी आंदोलनात विद्यार्थी, पालक, शिक्षक सामील झाले होते.
पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:43 AM
तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन ग्रामपंचायतने तोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दप्तरापेक्षा पाण्यानेच ओझे वाहण्याची वेळ आल्यामुळे विध्यार्थ्यांनी शाळेत प्यायला द्या म्हणत थेट पंचायत समितीसमोर आर्त टाहो फोडला.
ठळक मुद्देपंचायत समितीसमोर आंदोलन : पालक, शिक्षकांनीही घेतला आंदोलनात सहभाग