लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : तलवारीसारखे धारदार शस्त्र आणि फायबरचे दांडके जीपमध्ये घेऊन दरोड्याच्या तयारीने निघालेल्या पाच जणांच्या टोळीला येथील संभाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. यावेळी जप्त करण्यात आलेल्या कारमधून अनेक संशयास्पद वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
धारदार शस्त्रे घेऊन पाच इसम एका कारमधून (एमएच ४४ एक्स ५९९९) धर्मापुरी सारडगाव मार्गे परळी शहराकडे येत असल्याची गुप्त माहिती मंगळवारी रात्री संभाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या आधारे पोलिसांनी इटके कॉर्नर भागात सापळा लावला. रात्री ९.१५ वाजता सदरील कार समोरून येताना दिसल्याने पोलिसांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने कार न थांबविता वेगाने पळविण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून कारला एकमिनार चौकात गाठले. कार मधील नागनाथ राम गायकवाड (वय २२), बालाजी अन्तेश्वर कलवले (वय २०), राम राजेंद्र जाधव (वय २७) तिघेही रा. पानगाव ता. रेणापुर आणि संदीप उर्फ विष्णू शिवाजी मामडगे (वय २२), कारचालक निलेश विनायक चिमनदरे (वय २४ दोघेही रा. रेणापूर जि. लातूर) यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी कारची झडती घेतली असता मागील सीटखाली दोन फायबरचे दंडुके आणि एक धारदार तलवार आढळून आली.
तसेच, चालकाच्या सीटच्या पाठीमागे एका उपरण्याला पीळ मारुन त्याला धातुचे कडे मारता येईल, अशा उद्देशाने ठेवलेले होते. तर, कारची पाठीमागील नंबर प्लेट काढून डिकीत ठेवलेली दिसून आली. सदर टोळी दरोड्याच्या तयारीने निघाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी फौजदार विठ्ठल जयवंता शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींवर कलम ३९९ आणि शस्त्रास्त्र कायदा कलम ४(२५) अन्वये संभाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, सहा. अधीक्षक विशाल आनंद आणि पो.नि. उमेश कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विठ्ठल शिंदे, कर्मचारी सिरसाठ, पवार, गित्ते, देशमुख, घोळवे, सहा. फौजदार शेप यांनी पार पाडली.