बीड : जिल्हा रूग्णालयात सेवा बजावणाºया डॉक्टरांची खाजगी रूग्णालये सध्या जोमात सुरू आहेत. सरकारी दवाखान्यात लक्ष देत नाहीत. चांगले उपचार करीत नाहीत, अशी मानसिकता बदलून दलालामार्फत आपल्या खाजगी रूग्णालयात रूग्णांना पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी दलालांना ५०० ते १००० रूपये ‘कमिशन’ दिले जात असल्याचे समोर आले आहे. आहे. नातेवाईक मात्र डॉक्टर आपल्या रूग्णाला काही करतील, या भितीने तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.मागील काही दिवसांपासून डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच जिल्हा रूग्णालयात आल्यावर रूग्णांवर तत्काळ उपचार केले जात नाहीत. त्यांना तासनतास बसविले जाते. एवढेच नव्हे तर रूग्णालयात दाखल करून घेतले तर जमिनीवर झोपून उपचार करून घ्यावे लागतात, असे अनेक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये पसरविले जातात. त्यामुळे रूग्ण सरकारी दवाखान्याची पायरी चढताना विचार करतात. विशेष म्हणजे हे काम जिल्हा रूग्णालयात राजरोसपणे वावरणारे दलालच करीत आहेत. याचा फायदा खाजगी रूग्णालयांना होत असून फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.दरम्यान, सरकारी डॉक्टर म्हणून नोकरी करीत असताना खाजगी दवाखाना सुरू ठेवता येत नाही, असा नियम आहे. परंतु बीडमध्ये या नियमांना धाब्यावर बसविले जात आहे.सकाळी जिल्हा रूग्णालयात यायचे, रूग्णांना तपासून घाईगडबडीत राऊंड घ्यायचा आणि निघून जायचे, असे काहीसे नियोजन डॉक्टरांचे असते. याच दरम्यान, त्यांना एखादा रूग्ण गंभीर वाटला तर दलालामार्फत त्याचे मन परिवर्तन करून आपल्या खाजगी दवाखान्यात आणण्यास सांगायचे. विशेष म्हणजे रेफर करण्यापूर्वी किती रूपयांमध्ये उपचार होतील? याचा ‘आकडा’ ही सांगितला जातो.वास्वविक पाहता एकदा रूग्ण आपल्याकडे आल्यावर वेगवेगळे कारणे सांगून त्याला चार ते पाच दिवस रूग्णालयात अॅडमिट करून घ्यायचे आणि ठरलेल्या आकड्यापेक्षा दुप्पट रक्कम वसूल करायची, असा प्रकार केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.ही ‘दुकानदारी’ राजरोसपणे सुरू असूनही वरिष्ठ मात्र सर्व काही माहिती असतानाही केवळ तक्रार नाही, म्हणून ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.‘रूग्ण सेवा, हीच ईश्वरसेवा’ कागदावरचडॉक्टरला देव मानले जाते. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून रूग्ण उपचार घेत असतात. परंतु काही ‘दुकानदार’ डॉक्टरांमुळे चांगल्या डॉक्टरांची बदनामी होत आहे. ‘रूग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा’ हे वाक्य मात्र अशा दुकानदारीमुळे कागदावरच रहात असल्याचे दिसते.रुग्णालयातील कर्मचारीही दलालज्या पेशंटची परिस्थिती पैसे देण्यासारखी आहे, अशा पेशंटकडे दुर्लक्ष करायचे आणि परिस्थिती गंभीर असल्याचे सांगायचे. मग संबंधित वॉर्डमधील कर्मचारीच या रूग्णांना सरकारी रूग्णालयात कार्यरत असणाºया डॉक्टरच्या खाजगी रूग्णालयाचा पत्ता देतात. येथे चांगले उपचार होतात, असे सांगून रूग्णाला रेफर करतात. सर्व कर्मचारी असे नाहीत, मात्र काही कर्मचारी सध्या दलालाच्या भूमिकेत कार्यरत असून याचे कमिशन त्यांना मिळत आहे.समाजकारणाचा बोभाटाजिल्हा रूग्णालयात सामाजिक कार्यकर्ता या नावाखाली अनेक दलाल कार्यरत आहेत. आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, नेते आहोत, असे सांगून सर्वसामान्य रूग्णाला गाठायचे.मदतीच्या नावाखाली त्यांना खाजगी रूग्णालये, लॅबमधून तपासण्या करण्याचे सांगितले जाते. यातून रुग्णांची लूट व दलालांचे उखळ पांढरे होते.सामाजिक कार्यकर्त्यांची ही दुकानदारी बंद करण्याची गरज आहे. काही लोक मात्र प्रामाणिक समाज कार्य करतात, रुग्णसेवेत डॉक्टर व रुग्णांना मदत करतात.सरकारी दवाखान्यातून खाजगी दवाखान्यात रूग्ण पळविले जात असतील, तर ही गंभीर बाब आहे. असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. असे प्रकार दिसल्यास तक्रार करावी. नाव गोपनीय ठेवून याची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल.-डॉ.अशोक थोरातजिल्हा शल्य चिकित्सक, बीड
५०० रुपये घ्या; पेशंट द्या ; बीडमध्ये सरकारी डॉक्टरांची ‘दुकानदारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:09 AM
बीड : जिल्हा रूग्णालयात सेवा बजावणाºया डॉक्टरांची खाजगी रूग्णालये सध्या जोमात सुरू आहेत. सरकारी दवाखान्यात लक्ष देत नाहीत. चांगले ...
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात दलालांचा सुळसुळाट; वरिष्ठांकडून दुर्लक्ष