बीड : शब्द आम्ही पाळायचे आणि दिलेले शब्द तुम्ही टाळायचे आधी तीन महिने, नंतर ४० दिवस, नंतर दोन महिने वेळ दिला. चर्चेत गुंतवून ठेवाल तर वेळ मिळणार नाही. दोन महिने काय केले. लोक उचला आत टाका, नोटीस देता, हे काय चाललंय. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, डाव टाकू नये, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
बीड येथील इशारा सभेपूर्वी मांजरसुंबा येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. जरांगे म्हणाले, किती दिवस वेड्यात काढणार? आता नाही चालणार. आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसीतूनच आरक्षण घेणार, असा ठाम निश्चय त्यांनी व्यक्त केला. भुजबळांचं ऐकून मराठ्यांना टाळू नका, मराठा बाजूला गेल्यावर कळेल, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री गिरीश महाजन हे जरांगे यांच्या संपर्कात होते. याबाबत विचारणा केल्यावर जरांगे म्हणाले, आम्ही महाजन यांचा सन्मानच केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही सन्मान केला. वापस पाठवलं नाही. चर्चेत गुंतवून ठेवू नका, आरक्षण द्या, असे जरांगे म्हणाले.