शिरूरकासार (जि. बीड) : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. अशातच भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केले आहे. लोकसभेत मी तुमची काळजी घेते, नंतर तुम्ही माझी घ्या, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आहे. विशेष म्हणजे, यावेळी विद्यमान खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचीही उपस्थिती होती.
शिरूरकासार येथील धाकटी अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानवर महाशिवरात्र सोहळ्याचा समारोप शनिवारी झाला. महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन सुरू असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भेट देऊन पुढे गेले. नंतर आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे, डॉ. ज्योती मेटे पाठोपाठ माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या आता सर्व सत्ताधारी एकत्र आले आहेत. मी माजी आहे. कोणी कोणी मिळून माजी केले, हे आता इथे सांगू शकत नाही. पण माजी असल्याने मला काही जाहीरही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
एवढेच नव्हे तर आता लोकसभेसाठी माझी काळजी तुम्ही घ्या, नंतर तुमची काळजी मी घेते असे विधान त्यांनी केले. आगोदरच बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्यापैकी कोण उमेदवार असणार? असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यातच आता बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासमोर असे विधान केल्याने चर्चेला उधाण आले आहे.