माजलगाव (बीड ) : शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीच्या ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण कामे त्वरित करण्यात यावे या मागण्यांसाठी गंगाभिषन थावरे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने परभणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील दुष्काळ निवारणाची कामे त्वरित सुरु करण्यात यावेत, या मागणीसह माजलगाव तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांची २६५ जातीचा ऊस घ्यावा या साखर आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, कारखान्यांनी गतवर्षीच्या उसाचे बील द्यावे, गेटकन उसाचे गाळप करू नये, सरसगट कर्ज माफी करावी, रोजगार हमीची कामे सुरू करावीत यासह इतर मागण्यासाठी परभणी चौकात आज शेतकरी संघर्ष समितीने रास्तारोको केला. आंदोलकांनी गंगाभीषन थावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडी बारदाण्यासह सहभाग घेतला. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार एन.जी.झम्पलवाड यांना निवेदन दिले.