लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शासनाने उडीद आॅनलाईन नोंदणी करूनच खरेदी करण्याने शेतक-यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतक-यांना मदत व्हावी यासाठी कडा मार्केट कमिटीमध्ये आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी बीडच्या एजन्सीला जागा देण्याचे काम मार्केट कमिटीने केले आहे. उडीद खरेदी संबंधी काहीही जबाबदारी नसताना राष्ट्रवादीच्या ‘नवीन’ नेत्यांनी संचालक मंडळाचे कपडे फाडण्याची भाषा केली आहे. या नेत्यांनी याची माहिती घ्यावी आणि नंतर असे वक्तव्य करावे. तसेच कपडे फाडायला आल्यावर संचालकांना हात नाहीत काय ? असा टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.
आष्टी उपबाजार पेठ येथे एका दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री सुरेश धस बोलत होते. यावेळी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, उप सभापती राजेंद्र दहातोंडे, अनिल ढोबळे, युवराज पाटील, सतिश धस, राम मधुरकर यांच्यासह आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना धस म्हणाले, कडा मार्केट कमिटीमध्ये अत्यंत चांगला कारभार चालू असून काटकसर करण्यासाठी बैठकीत चहापानाचाही खर्च केला जात नाही. तसेच आष्टी उपबाजार पेठेसाठीच्या जागेसंबंधी न्यायिक प्रक्रिया सुरु असल्याने संबंधित जागेचा ३ कोटी रुपयांचा मोबदला देण्यासाठी कारवाई सुरु आहे.
त्यासाठी लवकरच पालकमंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या बैठकीला बाजार समिती सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मुंबईला जाणार आहेत. आष्टी उपबाजार पेठेत आणखी व्यापारी गाळे देण्यात येणार असून फक्त या ठिकाणी केवळ व्यापारच करावा लागणार आहे. यासाठी कडा, जामखेड, करमाळा या ठिकाणच्या व्यापा-यांनी आष्टी येथे यावे असे त्यांनी सांगितले.अभ्यास करून बोला....नव्यानेच राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्यांना आपण काहीतरी शेतक-यांसाठी करीत आहोत, असे दाखविण्यासाठी आपली भाषा मगरुरीची वापरत आहे. बाजार समितीत मोर्चा नेऊन संचालकांचे कपडे फाडू असे वक्तव्य केले. परंतु त्या टॅम्पोभर नेत्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे असा टोला सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.
सर्वात जास्त दराने कांदा खरेदीकडा बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वात जादा असलेल्या ५५ रुपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी झाली आहे. लासलगाव, करमाळा, सोलापूर या पेक्षाही या ठिकाणी जादा भाव शेतक-यांना देण्यात आल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.