अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस होऊनही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी व इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. अजूनही अनेक गावांमध्ये अधिग्रहणाची आवश्यकता आहे. तिथे प्रशासनाने सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.
दुचाकीस्वारांना होतोय धुळीचा त्रास
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील रिंगरोडचे काम गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदार यांनी एका बाजूने रस्ता उखडून व खोदून ठेवला, मात्र रस्त्याचे काम केले नाही. परिणामी रस्त्यावर मोठी धूळ साचली आहे. याचा मोठा त्रास वाहनचालकांना होत आहे. या रस्त्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी रिपाइंच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.
खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग
अंबाजोगाई : उन्हाळी हंगामात शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामाची तयारी करतात. पेरणीपूर्वी शेतजमीन नांगरणे, कोळपणे, वेचणी करणे, बांधावर उगवलेली झाडे-झुडपे काढणे, आदी कामे सुरू आहेत. या सर्व कामांना वेग आला आहे.
वातावरणात बदल; थंडी-तापाचे रुग्ण वाढले
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोनवेळा पाऊस पडला; तर आता दररोज आभाळ भरून येते. त्यामुळे कधी उन्ह, तर कधी पाऊस अशा वातावरणातील बदलांमुळे थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत.
लपून- छपून अनेक व्यवसाय सुरूच
अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. अनेक कडक नियम लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. असे असले तरीही शहरातील अनेक भागांत अनेक व्यावसायिक आपली दुकाने लपून छपून सुरूच ठेवत आहेत. पोलिसांनी अशा अनेकांवर कारवाई केली, तरीही पुन्हा लपून व्यवसाय सुरूच आहेत.