गेवराई : तालुक्यात सुमारे सोळापेक्षा जास्त तलाव धोकादायक झाले असून कधीही फुटण्याची शक्यता संबंधित ग्रामस्थ व्यक्त करत आहेत, हे तलाव फुटू नयेत म्हणून तातडीची उपाययोजना करा, प्रशासन त्यासाठी खर्च करू शकत नसेल तर शारदा प्रतिष्ठान या खर्चाचा भार उचलण्यास तयार असल्याचे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले.
पूर नियंत्रणरेषेतील गावांना दोन महिन्यांचे रेशन द्यावे, नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे तसेच विविध उपाययोजनांच्या संदर्भात माजी आ. अमरसिंह पंडित यांनी सोमवारी तहसील कार्यालयात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासकीय आढावा घेतला.
यावेळी माजी आ. पंडित यांनी धोकादायक तलावांच्या दुरूस्तीसाठी प्रशासकीय पातळीवर खर्च करण्यास अडचणी येत असल्यास शारदा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेकडून तात्पुरत्या डागडुजीसाठी होणारा खर्च करण्याची तयारी दर्शविली. वाहून गेलेली पिके, खरडलेल्या जमिनी, गाळामुळे भरलेल्या विहिरी, क्षतिग्रस्त रस्ते व पूल, फुटलेले तलाव, घरांची पडझड, फळबागांचे नुकसान, कृषी साहित्य व संसार उपयोगी साहित्याची झालेली हानी यासह विविध मुद्द्यांवर पंडित यांनी आढावा बैठकीत चर्चा केली. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी सचिन सानप, कृषी अधिकारी एच. व्ही. खेडकर, ना. तहसीलदार प्रशांत जाधवरसह विविध विभागांचे अधिकारी व नुकसानग्रस्त गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
130921\sakharam shinde_img-20210913-wa0032_14.jpg