रोहित्र बिघाडात वाढ; दुरुस्तीची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात विद्युत रोहित्रात वारंवार बिघाड होत आहेत. वीज अनियमित व अचानकच कमी जास्त दाबाने होत असल्याने रोहित्रांमध्ये बिघाड होतो. परिणामी हे बिघडलेले रोहित्र आठ ते दहा दिवस बदलून मिळत नाहीत. याचा मोठा फटका उन्हाळी हंगामातील पिकांना बसत आहे. पाण्याची आवश्यकता असताना पिकांना देता येत नाही.
सामाजिक अंतर दिसेना
बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाकडून नियम पाळण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिल कालावधीत मंडई व अन्य गुजरीच्या ठिकाणी नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून आले. लगतच्या गावांमधून शेतरी, ग्रामस्थ येतात तसेच शहरातील नागरिकही खरेदीसाठी येतात. मात्र खरेदी - विक्री करताना कोणीच भान राखत नसल्याने संसर्गाचा धोका आहे.
शौचालयाची दुरवस्था
वडवणी : शहरातील बाजार तळावर उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली असून, यामुळे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता करण्याची मागणी व्यापारी व नागरिकांनी यांनी केली आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.