बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बीड जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी तसेच परळी बायपासकरिता निधी मंजूर केला आहे. हा निधी केंद्राचा असताना याचे श्रेय घेण्याचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा प्रयत्न म्हणजे हास्यास्पद नौटंकी आहे, अशा शब्दात खा. प्रीतम मुंडे यांनी समाचार घेतला.
सत्ता येऊन दीड वर्ष लोटले. पण, धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासाठी कसलाही निधी आणला नाही, उलट केंद्राकडून आलेल्या निधीचे श्रेय घेण्याचा स्टंट मात्र ते करत आहेत. बीड रेल्वेसाठी केंद्राने त्यांच्या वाट्याचा निधी दिला. पण, राज्याचा वाटा आणण्यात मात्र ते सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही खा. मुंडे यांनी यांनी केली.
पंकजा मुंडे आणि मी केलेल्या प्रयत्नांना आणखी एक यश आले असून, केंद्र सरकारने परळी बाह्यवळण रस्त्यासाठी ६० कोटी, तर परळी- धर्मापुरी रस्ता रुंदीकरणासाठी ७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे खा. मुंडे म्हणाल्या.
परळी बायपास रस्त्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांनी सत्तेत असताना सुरुवातीपासूनच मोठे प्रयत्न केले होते. वेळोवेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जमीन संपादन व अन्य बाबी पूर्ण करून घेतल्या होत्या. या रस्त्यासाठी निधी मिळावा, यासाठी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी पंकजा यांनी व ४ मार्च २०२० रोजी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून मागणी केली होती, याशिवाय मागील महिन्यात नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेटही घेतली होती, असेही खा. मुंडे म्हणाल्या. स्वतः गडकरी यांनी ट्विट करून परळी बायपास एनएच ५४८ बी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी ६० कोटी २३ लाख रुपये, तर परळी - धर्मापुरी - पानगांव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ७९ कोटी ७२ लाख रुपये निधी मंजूर केल्याची माहिती दिली होती.
===Photopath===
050421\052_bed_1_05042021_14.jpg
===Caption===
खा. प्रीतम मुंडे