ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १६ - सलग तीन दिवस आलेल्या सुट्टीच्या कालावधीतून पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी जाणा-या तिघांवर चोरट्यांनी हल्ला केला. मात्र कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे ही चोरी अयशस्वी ठरली.
तीन दिवसांच्या सुट्टीमुळे बँक बंद असल्याने पेट्रोल पंपावर जमा झालेली मोठी रक्कम नगर अर्बन बॅंकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असतांना वाहनातील तीघा जणांवर हल्ला करण्यात आला. चोरट्याने पाळत ठेऊन रक्कम पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनचालक महादेव मुसळे याने कार भरधाव वेगात पळविल्याने रक्कम वाचली. एवढ्या कालावधीत अज्ञात चोरट्याने डुबे पेट्रोल पंपाचे मॅनेजर गोविंद कुलथे, विठ्ठल सदरे यांच्यासह ड्रायव्हरवर कोयत्याने वार केले. गाडीचीही तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला असून वाहन चालकाने प्रसंगावधान राखल्यानेच मोठा अनर्थ टळला आहे.एमएच-23 ई-4545 या गाडीतून मोठी रक्कम घेऊन बॅंकेत भरणा करण्यासाठी जात होती. बॅंकेच्या प्रवेशद्वारावरच कारमधून बाहेर पडतांना हल्ला झाला. जखमींवर सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे.