बीड/अंबाजोगाई : नव्याने खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा व फेरफार नोंद घेण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणी करून एजंटामार्फत सात हजार रुपये स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. येथे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
प्रफुल्ल सुहासराव आरबाड (३०) असे त्या तलाठ्याचे नाव असून, एजंट नजीरखान उमरद राजखान पठाण, यालाही बेड्या ठोकल्या आहेत. आरबाड हा अंबाजोगाई सज्जाचा तलाठी आहे. एका व्यक्तीने प्लॉट खरेदी केलेला आहे. त्याची सातबारा व फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी आरबाडने २३ सप्टेंबर रोजी दहा हजार रुपये लाच मागणी केली. तडजोडीनंतर सात हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले. तक्रादाराने एसीबीच्या बीड कार्यालयात धाव घेतली. त्याच दिवशी लाच मागणी पडताळणी केली.
२६ रोजी सायंकाळी एका बिअर बारच्या मागे एजंटासह तलाठी आरबाड दुचाकीवर आला. तक्रारदारास तलाठ्याने नजीरखान पठाणकडे पैसे देण्यास सांगितले. त्याने रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही झडप मारून पकडले. शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अमोल धस, अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे यांनी कारवाई केली.