गेवराई : तालुक्यातील बोरगाव बु. येथे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परची तपासणी करणाऱ्या तलाठी आणि कोतवाल यांना वाळू माफियांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार जणाविरूध्द चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूची अवैध वाहतूक बोरगाव बुद्रुक येथे होत असल्याची माहिती महसूल विभागाला गुरुवारी मिळाली. यानंतर तहसीलदार सचिन खाडे, मंडळ अधिकारी अमोल कुरुंदकर, तलाठी संजय नेवडे, राजकुमार धारूरकर, कोतवाल योगेश शहाणे, शिवशंकर आतकरे, दीपक राठोड यांचे पथक मध्यरात्री त्या भागात कारवाईसाठी गेले. यावेळी बोरगाव (बु) ते कुरणपिंपरीकडे जाणाऱ्या रोडवर एक पांढर्या रंगाचा विना नंबरचा टिप्पर पथकाने अडवला. त्यामध्ये पाहणी केली असता तो वाळूने भरलेला होता.
पथकाने टिप्पर चालकास वाळू वाहतूक करण्याचा परवाना मागितला. त्याच्याकडे परवाना नसल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. मात्र, यावेळी तेथे अचानक एक चारचाकी गाडीतून (एमएच १६ बीझेड ९७०१ ) आलेल्या चारजणांनी संजय नेवडे व दीपक राठोड यांच्यावर काठीने हल्ला केला. त्यानंतर चालक आणि टिप्पर घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंझुडे हे करित आहेत.