बीड : गावात पत्नीच्या नावे खडी क्रशर चालवून शासनाने संपादित केलेल्या जमिनीत बेकायदेशीरपणे दगड उत्खनन केल्याचा ठपका ठेवून पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील तलाठी पोपट नारायण गोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे आदेश काढले आहेत. तसेच पावणेचार कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
आष्टी तालुक्यातील खाकाळवाडी येथील संदीप दशरथ खाकाळ यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीत शेरी बुद्रूक (ता. आष्टी) येथे तलाठी पोपट गोरे यांनी पत्नी छाया यांच्या नावे विनापरवाना खडी क्रशर सुरू करून शासनाने तयार केलेल्या पाझर तलावात व बंधाऱ्यांत राजरोसपणे नियमबाह्य दगड उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी कड्याचे मंडळ अधिकारी जे. एस. जाधव, बी. पी. खडसे तलाठी यांनी शिवशंकर नावाने खडी क्रशर बेकायदेशीर असून ते तलाठी गोरे यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे खुलाशात नमूद केले.
कारवाईमुळे परिसरात खळबळवटणवाडी येथील सर्व्हे क्रमांक २५, ५४ व ७६ मध्ये ४ हजार ४४३ ब्रास दगड उत्खनन केल्याप्रकरणी तलाठ्यास पाचपट दंड केला असून त्याची रक्कम तब्बल पावणेचार कोटी इतकी आहे. शासनाची फसवणूक करत पत्नीच्या नावे खडी क्रशर चालविण्याचा ठपका ठेवून पोपट गोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.