बीड : सातबारावर नोंदीसाठी सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गेवराई तालुक्यातील रांजणी सज्जाचा तलाठी (वर्ग ३) राजाभाऊ बाबूराव सानप (रा. संभाजीनगर, हनुमान मंदिराजवळ, नगर रोड, बीड) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २४ एप्रिल रोजी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या आदेशान्वये तलाठी सानप यास निलंबित केले आहे.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या गट नं. ३५/३ संगम जळगाव येथील शेत जमिनीमधील सातबारावर तक्रारदार, त्यांचे भाऊ, बहीण तसेच आई यांच्या नावे वारसा हक्काआधारे नोंद घेण्यासाठी अर्ज केला होता. रांजणी सज्जाचा तलाठी राजाभाऊ सानप याने नोंद घेण्यासाठी पंचासमक्ष सहा हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तलाठी सानप याला ताब्यात घेण्यात आले होते.
त्याच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २६ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी सानप यास १४ दिवसांची कोठडी सुनावली होती, तर २ मे रोजी जामीन मिळाला होता. सदरील लाचेच्या सापळ्याची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांतर्गत पूर्वलक्षी प्रभावाने २४ एप्रिलपासून त्यास निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी मुधोळ यांनी काढले आहेत. तसेच तलाठी सानप याच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून, निलंबन कालावधीत बीड हे मुख्यालय देण्यात आले आहे.